निगडी प्राधिकरणात बेकायदेशीर वृक्षतोड : प्रशासनाने बजावली नोटीस
पिंपरी – वृक्षाच्या फांद्या अडथळा ठरत असल्याचे कारण दाखवून फांद्या छाटण्याची परवानगी घेणाऱ्यांनी थेट मुळासकट वृक्ष तोडला. हा प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी याबाबत आवाज उठवला असून महापालिका प्रशासनाने या बेकायदेशीर वृक्षतोडीची गांभिर्याने दखल घेत संबधितांना नोटीस बजावली आहे.
निगडी प्राधिकरण येथे आशियाना प्लाझा इमारतीजवळ सुरू असलेल्या रहिवासी बांधकाम प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले बदामाचे मोठे झाड बुधवारी (दि.18) अनधिकृतपणे तोडण्यात आले. तसेच जवळच असलेल्या रेन ट्रीच्या फांद्या देखील तोडण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील पर्यावरण प्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली व संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत गुरुवारी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला. तोडलेल्या वृक्षांसाठी महापालिकेकडून फक्त फांद्या तोडण्याची परवानगी घेतल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. मात्र, येथील मुळासकट झाडच तोडण्यात आल्याने वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे.
निगडी प्राधिकरण सिटीझन फोरम, देवराई फाउंडेशन, जलदिंडी, आंघोळीची गोळी, आंबेडकर संस्था, निसर्गराजा मित्र जीवांचे, सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग या संस्थांनी झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड विरोधात आवाज उठवला आहे. वृक्ष तोडण्यासाठी प्रशासनाची कायदेशीर परवानगी घ्यावी, तसेच तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या ऐवजी आणखी काही वृक्ष लावण्यात यावेत, अशी मागणी या संस्थांनी केली आहे.
झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी उद्यान विभागाकडून संबधितांनी घेतली होती. मात्र, रविवारची सुट्टी पाहून पूर्ण झाडच तोडण्यात आले आहे. याबाबत त्यांना नोटीस बजावली असून संबंधितावर कायदेशीररित्या कोर्टात खटला चालवला जाईल व कारवाई केली जाईल.
– प्रकाश गायकवाड, वृक्ष अधीक्षक, उद्यान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका