वेळवंडी, नीरा नदीवरील पूल खुले

पावसाळ्यापासून पाच महिने गेले होते पाण्याखाली

भाटघर – भाटघर वीजनिर्मिती केंद्राशेजारी एकूण चार पूल आहेत. वेळवंडी व नीरा नदीच्या संगमाच्या ठिकाणी दोन पूल आहेत. एक वेळवंडी नदीवर व तर दुसरा नीरा नदीवर आहे. हे दोन्ही पूल ब्रिटीशकालीन असून, धोकादायक झालेले आहेत.

यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने भोर तालुक्‍यातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते. बाकी सर्व पुलावर असणारे पाणी कमी झाल्याने वाहतूकीला परवानगी देण्यात आली; परंतु डिसेंबरपर्यंत हे दोन पूल पाण्याखालीच गेले होते. बारा दिवसांपासून पाण्याची पातळी कमी झाल्याने हे दोन्ही पूल उघडे पडले आहेत. दोन्ही पुलांची अवस्था दयनीय झालेली असून पुलांवरील दोन्ही बाजूने पाच ते सहा फुटांचा सिमेंट कॉंक्रिटचा भाग वाहून गेला आहे. याखालील मुरूम दिसून येत आहे.

तरीही या पुलावरून फक्त दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. पुलाला दगडी खांबांचा आधार असला तरी डागडूजीअभावी दगड निखळत आहेत. नीरा व वेळवंडी नदीच्या संगमाच्या ठिकाणी दुसरा पुल नीरा नदीवर बांधला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झाला आहे. दरवर्षी नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पूल पाण्याखाली जात आहे. दरवर्षी किमान दोन महिने तरी हा पूल पाण्याखाली राहतो. पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here