निवडणुकीपूरता उमेदवारांना जनतेचा कळवळा

दुष्काळाची पाहणी करण्यास टाळाटाळ : पालकमंत्रीही फिरकेनात

सातारा –
लोकसभा निवडणूकी दरम्यान जनतेच्या प्रश्‍नांसाठी गळा काढणारे उमेदवार निवडणूका पार पडल्यानंतर कोठेही दिसेनासे झाले आहेत. सध्या सातारा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे संकट ओढवले असताना एकाही उमेदवाराने दुष्काळी भागाची पाहणी केली नाही. त्याचबरोबर जिल्ह्याला पालकमंत्र्यासह सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप दोन्ही मान्यवरांनी दुष्काळी भागाचे प्रश्‍न जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

सध्या राज्यासह सातारा जिल्ह्यात प्रचंड मोठा दुष्काळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यात धरणांची संख्या अधिक असली तरी पाणीसाठा रोज कमी होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या भौगोलिक स्थिती आणि पोट कालव्याची कामे पुर्ण न झाल्यामुळे पुर्वेच्या तालुक्‍यांना अद्याप तेथे पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. पुर्वेकडी माण,खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव तालुक्‍यांना सर्वाधिक खासगी व शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची सवय पडलेली तेथील जनता मिळेल तेवढ्या पाण्यात समाधान मानत आहे. त्यामागे त्यांची अगतिकता आहे.

वास्तविक टॅंकरची संख्या आणि खेपा आणखी वाढविण्याची आवश्‍यकता आहे. परंतु ग्रामपंचायत ते पंचायत समिती ते तहसिलदार ते प्रांत कार्यालय असा टॅंकर मंजूरीची क्‍लिष्ट प्रक्रिया असल्यामुळे मागणी होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्याकडे कानाडोळा करित आहेत. अशा स्थितीत नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या सर्वच उमेदवारांनी जनतेच्या प्रश्‍नांसाठी जाहीरनाम्यात भलीमोठी आश्‍वासने दिली. परंतु निवडणूका होताच सर्वच उमेदवार नॉट रिचेबल झालेत. एकाही उमेदवाराने दुष्काळी भागात आवश्‍यक टॅंकर, चारा छावणी, रोजगार अन शिक्षणाची माहिती घेतली नाही.

सर्वच उमेदवारांना तुर्त चिंता निकालाची आहे. निवडणूकीत निवडून आलो तरच जनतेचे प्रश्‍न सोडवायचे, असा बहुधा त्यांचा विचार आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासाठी आचारसंहिता शिथील करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. ती मागणी मंजूर करण्यात आली आहे. मात्र, जेवढ्या तळमळीने मुख्यमंत्र्यांनी मागणी केली. तेवढी तळमळ त्यांच्या मंत्र्यांमध्ये दिसून आली नाही. सातारा जिल्ह्याला एक सोडून दोन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, त्यापैकी एका ही पालकमंत्र्यांनी तात्काळ दुष्काळी दौऱ्याची पाहणी करण्याची तत्परता दाखविली नाही. यावरून विद्यमान व भावी लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्‍नासंबधी किती आपुलकी आहे, हे दुष्काळाच्या निमित्ताने प्रातिनिधीक उदाहरण समोर आले आहे.

पवारांनी पाहणी केली, बाकीच्यांचे काय?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे मतदान करताच दुष्काळी भागाचा दौरा करण्यास सुरूवात केली. मात्र, पवार यांचे अनुकरण जिल्ह्यातील स्वकीय व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप केले नाही. त्यामुळे निवडणूकीतील सर्व पक्षीय उमेदवारांसह आमदार व खासदार दुष्काळी भागाचा दौरा करणार? की दुष्काळ निवारणासाठी नुसतीच प्रसिध्दी पत्रके काढणार? याकडे दुष्काही जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.