गोंदवले बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई

आचारसहिता नियमावलीत 19 मार्च 2004 च्या परिपत्रकानुसार टंचाई निवरणासाठीची सर्व कामे करता येत होती परंतु 22 मार्च 2019 परिपत्रकानुसार टंचाई काळात विंधन विहीर खोदणे व टॅंकरच्या प्रस्तावाखेरीज इतर कामे करण्यावर मर्यादा आल्या आहेत.परिणामी आचारसंहितेमुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ आला आहे.

गोंदवले – दुष्काळावर मात करण्यासाठी मंजूर असलेली पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. पुरेसे पाणी उपलब्ध असूनदेखील पाणीपुरवठा होत नसल्याने दुष्काळात गोंदवलेकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

गोंदवले बुद्रुक (ता. माण) गावाला कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत आंधळी तलावातून पाणी पुरवठा करण्याची योजना आहे.परंतु या तलावात पाणी उपलब्ध नसताना गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.गेल्या सलग दोन वर्षात आंधळी तलाव परिसरात पावसाने दडी मारल्याने हा तलाव सुमारे सहा-सात महिन्यांपासून कोरडा पडला आहे.परिणामी गोंदवल्याची पाण्यासाठी चांगलीच कोंडी झाली.या पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी सवमालकीच्या विहिरीतून ग्रामपंचायतीला पाणी उपलब्ध करून दिले.मात्र हे पाणी संपूर्ण गावाची तहान भागविण्यासाठी पुरेसे नाही.त्यामुळे गावालगतच्या वाड्या वस्त्यांसाठी एका टॅंकरच्या तीन फेऱ्या शासनाने मंजूर केल्या आहेत.परंतु मुख्य गावातील लोकांना मात्र पाण्यासाठी वाट बघावी लागत आहे.ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने पर्यायी मार्ग शोधला आहे.

उरमोडी प्रकल्पाच्या पाण्याने वाघमोडेवाडी येथील पाझर तलाव पूर्णपणे भरला असून त्यालगतच महाडुंग वस्तीजवळ असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीला पाणी उपलब्ध झाले आहे.या विहिरीतील पाण्याने गोंदवलेकरांची तहान अनेक दिवसांपर्यंत भागू शकते.त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्ताव दिला होता.दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून हा प्रस्ताव तातडीने मंजूर देखील केला होता.

या योजनेसाठीचा बारा लाख 84 हजार 192 रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.मात्र याच दरम्यान लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही योजना अद्याप कागदावरच राहिली आहे.या योजनेतून महाडुंगवस्ती पासून पाणीपुरवठ्याच्या टाकी पर्यंत पाईपलाईन करणे तसेच पम्प मशिनरी बसविण्याचे काम अवघ्या दहा दिवसांत पूर्ण होईल.परंतु ही संपूर्ण योजनाच आचारसंहितेच्या नियमात अडकून पडल्याने योजना पूर्ण करण्यास अडचण निर्माण झाली आहे.परिणामी सध्या पाच सहा दिवसातून केवळ पंधरा मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी उपलब्ध असूनही गोंदवलेकरावर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.