श्रीलंकेतील आत्मघातकी हल्लेखोर काश्‍मीरलाही येऊन गेले

श्रीलंकेच्या लष्कर प्रमुखांची धक्कादायक माहिती

कोलंबो – श्रीलंकेत इस्टरच्या दिवशी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणारे हल्लेखोर यापूर्वी जम्मू काश्‍मीर आणि केरळाही येऊन गेले होते. काही प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा काही अन्य विदेशी दहशतवादी संघटनांशी संधान साधण्यासाठी यापैकी काही दहशतवादी काश्‍मीर आणि केरळला येऊन गेले होते, अशी माहिती श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी दिली आहे. या दहशतवाद्यांच्या भारतभेटाबाबत भारताने हे बॉम्बस्फोट होण्यापूर्वीच श्रीलंकेला पूर्वकल्पना दिली होती, असेही लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले. काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या हालचालींबाबत गुप्तचर विभागांकडून माहिती मिळाली असल्याचेही. ले.ज.सेनानायके यांनी सांगितले. श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटांबाबत भारताकडून गोपनीय माहिती मिळाली असल्याचे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मान्य केले आहे.

“आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणारे संशयित भारतात काश्‍मीर, बेंगळूरु आणि केरळमध्ये गेले होते. मात्र त्यांच्याकडून काय हालचाली केल्या गेल्या याची पूर्ण माहिती मिळालेली नाही. पण काही स्वरुपाचे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा देशाबाहेरच्या अन्य संघटनांबरोबर संपर्क वाढवण्यासाठी ते तेथे गेले होते.’ असे लष्कर प्रमुख म्हणाले.
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने जरी स्वीकारली असली, तरी श्रीलंका सरकारने यासाठी “नॅशनल थवाहीथ जमाथ’ या स्थानिक कट्टरवादी संघटनेलाच जबाबदार धरले आहे. श्रीलंकेने “एनटीजे’वर बंदी घातली असून आतापर्यंत 100 संशयितांना अटक केली आहे.

या बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांची कार्यशैली, त्यांचा प्रवास आदी गोष्टी पाहता या बॉम्बस्फोटांमध्ये विदेशी संघटनांचाही हात असावा, असेही लष्कर प्रमुखांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.