नवी दिल्ली : राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा कारवाया करताना दिसून येत आहेत. त्यातच काही ठिकाणी छापेमारी देखील झाली त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना (शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. कोरोना घोटाळ्यातील संशयित आरोपी सुजीत पाटकर यांनी ईडीकडे साक्ष दिली आहे.
‘ईडीने जबरदस्तीने, धाक दाखवून माझा जबाब नोंदवून घेतल्याचे सुजीत पाटकर यांनी जबाबात म्हटले आहे. त्याबाबत संजय शिरसाट यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘यांना उगाच चौकशीसाठी बोलावले का? मारून मुटकून आरोप सिद्ध करता येत नाहीत. गुन्ह्यात अडकल्याचे पुरावे असतील तरच शिक्षा होते.’ पाटणकरांच्या जबाबावर शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.
तसेच पुढे बोलताना शिरसाट यांनी,’तुम्ही खून जरी केला असेल पण पुरावे नसतील तर न्यायालय सोडते ना? पुरावा असेल तर तुम्हाला कुठेही माफी मिळत नाही. त्यामुळे याचिका दाखल करून काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणारे जे कोणी असेल तर त्यांना सांगतो की आता वेळ तुमची येणार आहे. तुम्हाला तुरुंगात जावेच लागणार आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कोण तुरुंगात जाणार असे शिरसाट यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी थेट नावेच घेतली. ते म्हणाले की, ‘यात सर्वच आहेत. संजय राऊत असेल, अनिल परब असेल.’ ठाकरे कुटुंबातील कोणीही असेल तरी ते आत जाणारच असा दावा त्यांनी केला आहे.