मुंबई – अभिनेत्री रुबिना दिलैकने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने बॉलिवूड चित्रपट ‘अर्ध’मध्येही काम केले आहे. या चित्रपटात ती अभिनेता राजपाल यादवसोबत झळकली होती. मालिका आणि बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर आता ती पंजाबी चित्रपटात पदार्पण करणार आहे. तिला पंजाबी चित्रपटामध्ये पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.
गायक आणि अभिनेता इंदर चहल यांच्यासोबत धमाल करताना रुबिना दिलैक दिसणार आहे. या चित्रपटाबाबत रुबिनाने सांगितले की, “आमच्या घरी नेहमीच पंजाबी कुटुंबे येत असतात. त्यामुळे मला ही भाषा समजणे खूप सोपे होते. तसेच, मी एका पंजाबी मुलासोबत लग्न केले आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात पंजाबी भाषेचा प्रभाव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अभिनवला भेटल्यानंतर आम्ही जवळपास प्रत्येक पंजाबी चित्रपट बघायचो.”
पुढे ती म्हणाली, “मी पंजाबी चित्रपट करायचं ठरवले होते, पण योग्य प्रोजेक्टची वाट पाहत होते. हा चित्रपट माझ्या पहिल्या चित्रपटात मला जे पहायचे होते त्या माझ्या अपेक्षा पूर्ण करतो, हा ड्रामा आणि कॉमेडीने परिपूर्ण भरलेला चित्रपट आहे.”
रुबीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘छोटी बहू’ या मालिकेतून अभिनेत्रीने प्रसिद्धी मिळवली. यानंतर, रुबीना ‘सास बिना ससुराल’, ‘पुनर्विवाह – एक नई उमेद’, ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’, ‘देवों के देव…महादेव’ सारख्या लोकप्रिय शोचा भाग झाली. रुबिनाने ‘बिग बॉस 14’ चे विजेतेपदही पटकावले आहे. ‘बिग बॉस’नंतर रुबीना ‘खतरों के खिलाडी 12’मध्येही दिसली होती.