मुंबई – आमचा संयम तोडायला लावू नका, अन्यथा आम्ही तलवारी सुद्धा हातात घेऊ, असा थेट इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला दिला होता. मात्र, संभाजीराजे यांची तलवार उपसण्याची भाषा योग्य नाही, अशा प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातून संभाजीराजेंवर निशाणा साधला आहे.
जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल.
कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही.
करोना व लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यांत गेल्या महिनाभरापासून वाढ झाली आहे.
गरीब लोकांच्या घरात जे किडूकमिडूक होते ते आता संपले. त्यामुळे एकतर आत्महत्या करणे नाहीतर गुन्हेगारीचा मार्ग पत्करून जिवंत राहणे, हाच मार्ग त्यांच्यासमोर आहे. सरकार यापैकी कोणत्या मार्गास मान्यता देणार आहे? ही जबाबदारी फक्त राज्यांची नाही तर केंद्राचीसुद्धा आहे हे आधी मान्य केले पाहिजे.
सीमेवर चीनचे 60 हजार सैनिक जमा झाले आहेत व आपले सैनिक त्यांना चोख उत्तर देतील, पण त्यामुळे गोरगरिबांच्या पोटापाण्याचे, रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत. लोकांना रोजगार हवा आहे. लोकांना जगायचे आहे. पोराबाळांना कसेही करून जगवायचे आहे. त्यासाठी तुमचा तो कायदा, नियम वगैरेही मोडायला लोक तयार झाले आहेत. ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली? असा सवालही शिसवनेने उपस्थित केला आहे.
मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे, असेही शिसवनेने अग्रलेखात म्हंटले आहे.