माजी सैनिकांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार 18 लाखांचा ‘ध्वजनिधी’

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणार कपात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 18 लाख रुपयांचा ध्वजनिधी सुपूर्द केला जाणार आहे. माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियाच्या पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केली जाणार आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी हे जिल्हा सैनिक कार्यालयाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाशी 31 जानेवारी 2019 रोजी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 18 लाख रुपये ध्वजनिधी उपलब्ध करुन देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वर्ग एक ते चारमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या मासिक वेतनातून ही रक्कम कपात केली जाणार आहे.

देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांची वीरमाता, वीरपत्नी, पिता व अपंग सैनिक यांच्या कुटुंबियांना या ध्वजनिधीतून आर्थिक मदत केली जाते. याशिवाय माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी या निधीचा वापर केला जातो. त्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून हा निधी गोळा केला जातो. त्यानुसार महापालिकेकडे या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जुलै महिन्याच्या वेतनातून ही रक्कम कपात करण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍त श्रावण हडकिर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. कपात केलेल्या निधीचा एकत्रित धनादेश मा. जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कार्यालय, पुणे यांच्या नावाने तयार करुन तो प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्याची सूचनादेखील दिली आहे.

वेतनातून कपात होणारी रक्कम पुढीलप्रमाणे –

अधिकारी कर्मचाऱ्यांचा वर्ग – रक्कम

1) वर्ग 1- 500 रुपये
2) वर्ग -2 (मुख्याध्यापकांसह)- 300 रुपये
3) वर्ग 3- (शिक्षकांसह)- 200 रुपये
4) वर्ग 3- (सफाई कर्मचारी वगळून) 100 रुपये

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)