पिंपरी : गावठी कट्‌टा, पिस्तूलसह दोघांना अटक

वाकड ब्रिजवर तरुणाकडून कट्टा जप्त : भोसरीत सराईताकडे सापडले पिस्टल

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शहरात गावठी कट्टे बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना गावठी कट्टा आणि पिस्टलसह अटक केली आहे. सागर जानकीप्रसाद साहू (वय-28 रा. लिंकरोड चिंचवड, मूळ गाव. बघाईयो, उत्तरप्रदेश) व सागर शेवते ( वय- 30 रा. चिखली घरकुल) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यांच्याकडून 2 गावठी कट्टे व 3 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली होती की, वाकड येथील ब्रिजजवळील राजयोग हॉटेलजवळ एक इसम गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी येणार आहे. पोलिसांनी हॉटेल राजयोग परिसरात साध्या वेशात सापळा रचून सागर साहूला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक काडतूस असा 20 हजार 500 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिझे हे करीत आहेत.

भोसरी येथील पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सागर शेवते याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस जप्त केले आहे. खंडणी व दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुंजोबा मित्र मंडळ, भोसरी गावठाण येथील गणपती मंदिरासमोर छापा मारुन तिथे बसलेल्या सागर शेवते याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला 30 हजार 400 रुपयाचे एक देशी बनावटीचे पिस्टल व त्याच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतूस आढळले.

Leave A Reply

Your email address will not be published.