पुणे – पिंपरी चिंचवड लॉन टेनिस अकादमी (पीसीएलटीए) यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने आयोजित व वाधवानी कन्स्ट्रक्शन प्रायोजित पीसीएलटीए हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सुनील लुल्ला याने ५० वर्षावरील एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, नियती जिरंगे, अर्जुन चितळे, राहुल कोठारी व रवी कोठारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
निगडी प्राधिकरण टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत २५ वर्षावरील महिला गटात अंतिम फेरीत नियती जिरंगे हिने गीता केकरेचा ७-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ३५ वर्षावरील पुरुष गटात अंतिम लढतीत अर्जुन चितळे याने अमित रानडेचा ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
५० वर्षावरील पुरुष गटात सुनील लुल्लाने निर्मल वाधवानीचा ६-३, ६-० असा पराभव करून विजेतेपद मिळवले. दुहेरीत सुनील लुल्लाने संदीप बेलुडीच्या साथीत निर्मल वाधवानी व राजेश मित्तल यांचा ६-२, ७-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. २५ वर्षावरील गटात अंतिम फेरीत राहुल कोठारी व रवी कोठारी यांनी अमित किंडो व शिलादित्य बॅनर्जी यांचा ६-४,४-६, ११-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
WTC : इंग्लंडला हरवून भारताने WTC पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, जाणून घ्या किती झाला फायदा…
स्पर्धेचे पारितोषिक वितरण वाधवानी कन्स्ट्रक्शनचे धर्मेश वाधवानी व निर्मल वाधवानी, रोटरी क्लब पिंपरी इलाईटचे अध्यक्ष रोटेरियन अशोक शिंदे, क्रीडा संचालक अतुल अर्जुनवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीएलटीए प्रमुख व स्पर्धा संचालक नंदू रोकडे, कल्पेश मकानी, गिरीश कुलकर्णी, गिरीजा येरवडेकर, विनोद कलोत्रा आदी उपस्थित होते.