न्युयॉर्क :– फुटबॉल विश्वकरंडक २०२६ साली अमेरिकेसह मेक्सिको व कॅनडा या देशांत रंगणार आहे. सोमवारी जागतिक फुटबॉल महासंघाने या स्पर्धचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेची सुरुवात ११ जूनपासून सुरू होणार आहे.
उद्घाटनाचा हा सामना मेक्सिकोच्या अझ्टेक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर अंतिम लढत १९ जुलैला अमेरिकेतील न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे. तसेच अटलांटा आणि डल्लास या शहरामध्ये उपांत्य फेरीचे सामने होतील.
तीन देशांमधील एकूण १६ शहरे या स्पर्धेचे आयोजन करणार असून सर्वाधिक सामने अमेरिकेतच होणार आहेत. गेल्या स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले होते. मात्र, २०२६ सालच्या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत २४ सामने जास्त होतील. १६ ठिकाणांवर मिळून एकूण १०४ सामने खेळवले जातील. स्पर्धेत चार संघांचे १२ गट असतील, त्यापैकी ८ संघांमध्ये बाद फेरीचे सामने खेळवले जातील.
स्पर्धा होणारी केंद्रे – अटलांटा, बोस्टन, डॅलस, ग्वाडालजारा, ह्यूस्टन, कॅन्सस सिटी, लॉस एंजेलिस, मेक्सिको सिटी, मियामी, मॉन्टेरी, न्यूयॉर्क-न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को बे एरिया, सिएटल, टोरंटो आणि व्हँकुव्हर.