कोटा (राजस्थान): गांधी-नेहरू कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली कोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी यांना आठ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. सोमवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावताना स्थानिक कोर्टाने तिला आठ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत बूंदी मध्यवर्ती कारागृहात पाठविले आहे. राजस्थान पोलिसांनी रविवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला त्यांच्या अहमदाबाद निवासस्थानावरून अटक केली होती.
बुंदी (राजस्थान) पोलिसांनी अभिनेत्रीविरूद्ध मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी-नेहरू कुटुंबातील इतर सदस्यांविरूद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 10 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला. या महिन्याच्या सुरूवातीला त्यांना नोटीस देण्यात आली होती आणि यासंदर्भात उत्तर देण्यास सांगितले होते.
प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि बुंदी येथील रहिवासी चारमेश शर्मा यांनी रोहतगी यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोहतगीने 6 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर रोजी सोशल मीडिया अकाउंट फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केली. शर्मा यांनी अभिनेत्रीविरूद्ध केलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, आक्षेपार्ह साहित्याने देशाची प्रतिमा डागाळली आहे, अश्लीलता आणि धार्मिक द्वेष पसरविला आहे आणि स्त्रीची प्रतिमा खराब केली आहे.