पुणे – “काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहेत. मी नेमके काय बोललो, अन् कुठे बोललो, हे पाहा’, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्मचारी भरतीप्रश्नी नाव न घेता आमदार रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी रोहित पवारांनी या प्रश्नावर सोशल मीडियाद्वारे नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यामुळे दोन्ही पवारांत वाक्युद्ध रंगल्याचे चित्र आहे.
अजित पवार शुक्रवारी खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “सध्या राज्यातील विविध विभागांत दीड लाखांपेक्षा जास्त भरती सुरू आहे. परंतु विरोधकांना उकळ्या फुटतात आणि सोशल मीडियावर बातम्या ते पोहचवतात. मात्र, सत्य परिस्थिती पाहत नाहीत. विभागनिहाय आढावा घेत असताना अनेक ठिकाणी कर्मचारी कमी दिसले.
काही ठिकाणी ताबडतोब कर्मचारी लागतात. शिक्षक, डॉक्टर, पोलीस असे काही विभाग आहेत. नवीन शिक्षकांची भरती होईपर्यंत निवृत्त झालेल्यांना तात्पुरते घेतले. तशीच पोलीस किंवा इतर विभागात भरती करताना काही काळ लागतो. तो काळ कंत्राटी माध्यमातून काढावा लागतो. त्याप्रमाणे राज्य सरकार कार्यवाही करत आहे. त्यामुळे त्यांनी माहिती घेऊन बोलावे.
तो जीआर मागील सरकारचा
‘कंत्राटी भरतीचा तो जीआर मागच्या काळातील सरकारचा आहे. त्यावर कोणाच्या सह्या आहेत, हे मी दाखवू शकतो. परंतु विरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. मी बोलताना वस्तुस्थिती सांगितली. कारण नसताना गैरसमज करू नका, असे अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले.