पवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे

आ. शशिकांत शिंदे : कारवायांची भीती दाखवून अनेकांवर दबाव

सातारा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशात आणि राज्यातील राजकारणाचा चार दशकांचा अनुभव आहे. पवार यांना राजकारणातून संपवण्याची भाषा विरोधक करतात. मात्र, पवारांना संपवणारा जन्माला यायचा आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान, निवडणुका आल्यामुळे अनेकांवर कारवायांची भीती दाखवून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, मर्दासारखे लढा, रडीचा डाव कशासाठी, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार रविवारी दि. 22 रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी भवनातील बैठकीत आमदार शिंदे बोलत होते. यावेळी आमदार बाळसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, भारती शेवाळे, शिवाजी सर्वगौड, सुरेंद्र गुदगे, कविता म्हेत्रे, बाळासाहेब सोळस्कर, संजयनाना साळुंखे, शशिकांत पिसाळ, सतीश चव्हाण, किरण साबळे- पाटील, सम्रिंद्रा जाधव, जयश्री पाटील, राजाभाऊ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

“”गेली पाच वर्षे ज्यांनी सरकारवर आरोप केले, तीच मंडळी भाजपाने पक्षात घेऊन त्यांना पवित्र करण्याचे काम केले आहे. विरोधकांनी मर्दासारखे लढण्याची गरज असून रडीचा डाव आता बंद करावा. आमचे श्रध्दास्थान असलेल्या शरद पवारांना टार्गेट करण्यात येत असल्याने कार्यकर्ते पेटून उठले असून ते निश्‍चितच परिवर्तन करतील,” असे शिंदे यांनी सांगितले. शरद पवारांनी राज्यात सुरु केलेल्या दौऱ्याला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांना धडकी भरली असल्याने राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी राज्यात भक्कम असून सातारा जिल्हा बालेकिल्ला राहीलच, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचा विचार संपवणे एवढे सोपे काम नाही, रविवारी मोठे शक्तीप्रदर्शन करुन विरोधकांना राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्या, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. पक्षात कोण आले आणि कोण गेले याचा पक्षावर परिणाम होणार नाही. पक्ष जिल्ह्यात मजबूत असून कार्यकर्ते पक्षाबरोबरच आहेत. प्रत्येकाने मी उमेदवार आहे, असे समजून लढा, असे सुनील माने म्हणाले. निवडणुकीपुरते लोकशाहीतील राजे, असे जनतेला काहीजण म्हणतात, मात्र निवडणुका संपल्या की त्यांना विसरुन जातात, अशा शब्दात माने यांनी नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली. बाळासाहेब सोळस्कर, शशिकांत पिसाळ, देवराज पाटील यांची भाषणे झाली. राजेंद्र लावंघरे यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार पाटील यांनी आभार मानले.

जनतेचा “करंट’ सहन होणार नाही
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जाणाऱ्या मार्गावरील विद्युत पुरवठा करंट लागेल या भीतीने खंडित करण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना बसवणारा “करंट’ सहन होणार नाही, अशा शब्दात आमदार शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.