उपद्रवमूल्य नेत्याचे वादळ आंबेगावात धडकणार?

शिरूर- आंबेगाव मतदारसंघात चुरशीची लढत : शिवसेनेतून रसद मिळणार

– राजेंद्र वारघडे

पाबळ -शिरूर- हवेली व शिरूर-आंबेगाव दोन्ही मतदारसंघात कॉमन, उपद्रवमूल्य असलेला नेता, शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल शिक्‍कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी शिवसेनेची मोठी रसद व राष्ट्रवादीतील दिग्गजांची साथ मिळणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्यांना संधी द्या, असे आवाहन करत महाराष्ट्र पिंजून काढण्याचे काम सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर हीच बाब वास्तवात आली आहे. हाच निकाल देताना मतदारांनी तरुणाला संधी देत प्रस्थापित नेतृत्वाला नाकारले असल्याची बाब निकालानंतर स्पष्ट झाली.

नेमका हाच आधार घेत शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात त्या नेत्याचे निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिरूर-आंबेगाव मतदारसंघात “सुलभ’ लढाई होण्याची शक्‍यता मावळत असल्याची बाब पुढे येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या पावित्र्यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षांतरे झाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या भवितव्याच्या आशेने अनेक दिग्गजांची या उमेदवारीवर सहमती झाली असल्याची माहिती मिळत आहे. या नेत्याचाच दुजोरा देत सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारीची शक्‍यता होती. मात्र, शिवसेनेने त्यांना उपनेतेपदाची जबाबदारी दिल्याने आढळराव पाटील यांची उमेदवारी जवळपास नसल्याची बाब त्या नेत्याला “पूरक’ ठरल्याची चर्चा आहे.

शिवसेना-भाजप युती अस्तित्वात येईल
शिवसेना- भाजप युती अस्तित्वात येण्याची मावळलेली दाट शक्‍यता पुन्हा अस्तित्वात आल्याने मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर, शिवसेनेच्या पाठिंब्याने व राष्ट्रवादीतील अस्वस्थ नेत्यांच्या मदतीवर प्रस्थापित नेतृत्वाला मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्‍यता पुढे येत आहे. येत्या दोन दिवसांत या लढतीवर शिक्‍कामोर्तब होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी व शिवसेनेतील एका खास समन्वयकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

शिरूर-आंबेगावचे नेतृत्व शिरूरकडे यावे
आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्‍यातील 39 गावांची मानसिकता, न सुटलेला पाणीप्रश्‍न, केंद्रातील भाजपची सत्ता व शिवसेनेची होऊ घातलेली युती या पार्श्‍वभूमीवर मधल्या फळीतील नेत्यांची अस्वस्थता व सर्वांना सहज हाताळण्याची त्या नेत्याची कला आदी कारणे जमेच्या आहेत. त्यामुळे शिरूर- आंबेगाव मतदारसंघाचे नेतृत्व शिरूर भागातील गावांकडे यावे, ही मानसिकता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)