पवना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा

  • पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने केली तपासणी
  • धरणात 36.83 टक्‍के पाणीसाठा

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणाची पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने तपासणी केली आहे. तपासणीत धरणाला धोका असल्याचे निदर्शनास आलेले नाही. धरण सुरक्षित असल्याचे, पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी शासनाला कळविले आहे. तर धरणात आजमितीला 36.83 टक्‍के पाणीसाठा असून, जुलैअखेरपर्यंत हा साठा पुरेल, असेही त्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.

पावसाळ्यात धरणाला काही धोका निर्माण होवू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी केली जाते. धरणांची दरवर्षी नियमित 31 मे पूर्वी तपासणी जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. त्यानुसार पवना धरणाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये धोकादायक पद्धतीने गळती, धरणाला धोका असल्याचे निदर्शनास आले नाही. धरण सुरक्षित असल्याचे पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.

पावसाळा जवळ आला आहे. काय उपाययोजना कराव्यात. त्याबाबत जलसंपदा विभागाने आम्हाला सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मावळ तालुक्‍यातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविली जाते. मावळ परिसरातील गावांसह शेतीसाठीही पाणीही या धरणातून दिले जाते.

प्रत्येक घटकाची तपासणी
पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी केली जाते. तपासणी करताना धरणातील गळती मोजणे, सांडवा, धरणाच्यावरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत का, देखभाल-दुरुस्ती, नोंदीनुसार कामे झाली आहेत का, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा अशा विविध घटकांची तपासणी होते. या तपासणीत पवना धरण सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.

धरणात 36.83 टक्‍के पाणीसाठा
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसह मावळमधील विविध गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागीलवर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरण तीनवेळा 100 टक्‍के भरले होते. परिणामी, यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाई भासली नाही. लॉकडाऊनमुळे नागरिक दोन महिने घरी असूनही पाण्याच्या तक्रारी आल्या नाहीत. धरणात आजमितीला 36.83 टक्‍के पाणीसाठा आहे. जुलैअखेर पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे, असेही गडवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.