कर्नाटकात महाराष्ट्रासह या ५ राज्यांतील प्रवाशांना ‘नो-एन्ट्री’

कोरोना संकट थोपवण्यासाठी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून प्रवासास बंदी

मुंबई – देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काही राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याच पाहायला मिळत असून दुर्दैवाने महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये देशात अव्वल स्थानी आहे. याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटक सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घोषित केला असून या निर्णयानुसार कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या ५ राज्यांमधून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे. विशेष म्हणजे या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी अद्याप कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, राज्यात आतापर्यंत केवळ २ हजार २८३ रुग्ण कर्नाटकात आढळून आलेत. विशेष म्हणजे हळूहळू राज्यातील सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे.

दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे राज्यात कोरोना प्रसार वाढीस लागू शकतो हा संभाव्य धोका ओळखून कर्नाटक सरकारनं पाच राज्यांमधून होणारी प्रवासी वाहतूक थांबण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातर्फे प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.