कामशेतमधील नऊ महिन्यांच्या बालकास करोनाची लागण

कामशेत – कामशेतमधील एका नऊ महिन्यांच्या बालकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि. 28) दुपारी आढळून आले आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कामशेत परिसर भयभीत झाला आहे.

कामशेत येथील नाणे रोड रेल्वे गेटजवळील संतोषी माता मंदिरामागील चाळीत वास्तव्यास असणाऱ्या एका कुटुंबातील नऊ महिन्याचा मुलगा आजारी असल्याने त्याला कामशेत येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यास कावीळ झाल्याचे डॉक्‍टरांना आढळून आले. त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या दरम्यान या बाळाची करोना तपासणी केली असता त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नऊ महिन्यांच्या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाळाच्या संपर्कातील त्याची आई, वडील यांची देखील तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल दोन दिवसांत येणार असल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या बाळाच्या संपर्कातील 14 जण “हायरिस्क’मध्ये असून, 11 जण “लो रिस्क’मध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर कामशेतमधील पूर्वेकडील शिक्षक सोसायटी ते गुलाब राणे यांचे घर, पश्‍चिमेस दत्त कॉलनी ते संजय पाडावकर यांचे घर दक्षिणेस पोलीस स्टेशन ते सहारा कॉलनी आणि उत्तरेस नाणे रोड रेल्वे गेट ते बाळकृष्ण शिंदे यांचे घर एवढा परिसर कंटेन्मेंट झोन, तर पूर्ण कामशेत, नाणे, खामशेत, कुसगाव खुर्द ही गावे बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.