सूर्यकांत पाटणकर
पोलीस यंत्रणेची बघ्याची भूमिका
पाटण – पाटण शहरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे या वाहतूक कोंडीचा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाटण शहरातील जुना स्टॅंड ते नवीन स्टॅंड परिसरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून पोलीस यंत्रणा मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र पाटणमध्ये आहे.
पाटण शहरातील जुना बसस्थानक ते नवीन बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. रस्त्यावर झालेले अतिक्रमण बेशिस्त पार्किंग रस्त्याच्या कडेला असणारे विद्युतखांब तर रस्त्याच्या कडेला उभी असणारी वडापची वाहने यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मात्र शहरात वाहतूक नियंत्रणासाठी असणारे पोलीस मात्र कुठेच दिसत नसल्याने वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पाटण येथील जुना स्टॅंड परिसरात रस्त्यावर झालेले अतिक्रमण तर रस्त्याच्या कडेला असणारी वडाप वाहतुकीची वाहने यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बाहेरून येणाऱ्या बसेस याठिकाणी थांबत असल्याने तसेच बाजूला रिक्षा स्टॉप असल्याने तर याच ठिकाणी वडाप वाहतुकीचा अड्डा असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. मात्र याचा त्रास विद्यार्थी वाहनचालक व पादचाऱ्यांना होत आहे. याठिकाणी वाहतूक कोंडीत अडकल्यास नाहक वेळ वाया जात आहे.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. तसेच झेंडा चौक या ठिकाणीही जुना स्टॅंड नवीन स्टॅंड व लायब्ररी चौक या ठिकाणी जाण्याच्या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. मात्र याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. पाटणचा सोमवारी आठवडा बाजार असतो. त्यामुळे बाजाराला येणाऱ्या तसेच शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. मात्र याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची अडचण होत आहे.
पाटण पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे कारण दिले जाते. पाटण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी जुना एसटी स्टॅंड व नवीन बसस्थानक याठिकाणी दोन-दोन कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत असतात. मात्र, हे कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी इतर ठिकाणी बसलेले असतात. त्यामुळे या मुख्य मार्गावरील बेशिस्त वाहतुकीवर तसेच बेजबाबदारपणे वागणाऱ्या वाहनचालकांवर त्यांचा कसलाही अंकुश नाही. यामुळे होणाऱ्या कोंडीवरुन दिसते. वाहतूक कोंडीतील त्रासलेला वाहनधारक जेव्हा पोलीस ठाण्यात फोन करतो, तेव्हा वाहतूक नियंत्रणासाठी कार्यरत असणारा कर्मचारी हजर होतो. त्यामुळे वाहनधारकांसह वाहतूक कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावण्याची वेळ आली आहे.
मुख्य मार्गावर वर्दळ नेहमीची
सोमवारी पाटणचा आठवडा बाजार असतो. त्यामुळे बाजाराला येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असते. तर तालुक्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही संख्या जास्त असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र सोमवारी जुना स्टॅंडवर एक वाहन पंक्चर झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.