सातारा – साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या मैदानावर गुरुवार, दि 21 ते रविवार, दि. 24 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत ग्रामीण भागातील महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी माणदेशी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या महोत्सवात 180 हून अधिक महिला उद्योजक सहभागी होत असून दोन लाखापर्यंतच्या अद्ययावत मशिनरी पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात महिला उद्योजक आपले शेती व बारा बलुतेदारीचे कौशल्य सादर करतात. यंदा महोत्सवाला सेल्को फौंडेशन (बंगळुरू), ब्ल्यू स्टार ऑटोमोबाइल (इचलकरंजी), सीएसी ई-गव्हर्नन्स (शिरूर) व म्हसवडकर ट्रेडिंग कंपनी यांचे सहकार्य लाभले आहे.
या महोत्सवात घोंगडी, चादरी, लेदरच्या वस्तू, बदाम, शेंगदाणा, सूर्यफूल तेल, रसायनविरहीत डाळी, पिके, धान्य, बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. झुणका- भाकरी, थालीपीठ, मासवडी, मांडे, दालबाटी, अन्य खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. जात्यावर डाळी भरडण्याचा व ताक बनविण्याचा अनुभव सातारकरांना या महोत्सवाच्या निमित्ताने घेता येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय रोकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार, दि. 22 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व सायंकाळी पाच वाजता भारूडसम्राज्ञी चंदा तिवारी यांचे भारूड होणार आहे.
शनिवार, दि. 23 रोजी सायंकाळी पाच वाजता माणदेशी उद्योजिका पुरस्कार वितरण आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते पन्नास मुलींना सायकलवाटप करण्यात येणार आहे. रविवार, दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता माणदेशी चॅम्पियनच्या मुलींची कुस्ती व “गजर महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम होणार आहे. जेन, घोंगडी, ज्वारी, बाजरी, कडधान्ये व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन चेतना सिन्हा यांनी केले आहे.