पुणे -रेल्वे प्रवाशांना दर्जेदार, परवडणारे आणि आरोग्यदायी जेवण देण्यासाठी भारतीय रेल्वेने “इकॉनॉमी मिल’ ही संकल्पना मांडली आहे. विशेषत: जनरल डब्यांतील रेल्वे प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत दोन प्रकारचे जेवण दिले जाईल. यात “इकॉनॉमी मिल’ 20 रुपये, तर “कॉम्बो’ जेवणाची किंमत 50 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
यात “इकॉनॉमी मिल’मध्ये पुरी, भाजी आणि लोणचे पाकीट 20 रुपयांना मिळणार आहे. त्यात 7 पुऱ्या, 150 ग्रॅम भाज्या आणि लोणचे यांचा समावेश असेल. तर, कॉम्बो मिलमध्ये राजमा-भात, खिचडी, कुलचे-छोले, छोले-भटुरे, पावभाजी किंवा मसाला डोसा हा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय प्रवाशांसाठी 200 मिलीचे पॅकेज पाणी उपलब्ध असेल. जे तीन रुपयांत मिळणार आहे. हे जेवण रेल्वे स्थानकांवर असलेल्या आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे पर्यटन आणि खानपान सेवा) च्या किचन युनिट्सच्या रिफ्रेशमेंट रूम्स आणि जन आहार्सच्या विस्तारित सेवा काउंटरद्वारे दिले जात आहे.
प्लॅटफॉर्मवर जनरल डब्याजवळ सेवा काउंटर पुरवले जातील. यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवेचा लाभ घेता येईल. अधिकृत विक्रेत्यांद्वारे सेवा काउंटरचा वापर प्रवाशांना जेवण साठवण्यासाठी, पुरवण्यासाठी आणि विक्रीसाठी केला जाईल. ही सेवा सामान्य प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आणि आरोग्यदायी जेवण मिळू शकेल, असे प्रशासनाने म्हटले आहे.
या स्थानकांवर सुविधा उपलब्ध आहेत
कुर्ला (एलटीटी), नागपूर, पुणे, मनमाड, खंडवा आणि भुसावळ या स्थानकांवर पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तर, दक्षिण मध्य रेल्वेच्या औरंगाबाद स्थानकात ही सुविधा सुरू केली आहे.