– माधव विद्वांस
लष्करात भरतीसाठी आवश्यक प्राथमिक शिक्षणाची संकल्पना जोपासणारे व पुण्यातील महाराष्ट्र मंडळाची स्थापना करणारे कॅप्टन शिवरामपंत दामले यांचा आज स्मृतिदिन. “शिवाकाका’ या नावानेही ते ओळखले जात. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1900 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील किवळे गावी झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली.
वर्ष 1942 ते 1948 या कालावधीमधे ते ब्रिटिश भारतीय सैन्यात सामील झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांची नियुक्ती बेळगाव येथे झाली होती. त्यांना खेळाची आवड असल्याने ते कुस्ती आणि व्यायामाचा नियमित सराव करीत. भारतीय युवकांना शास्त्रीय क्रीडा प्रशिक्षण मिळावे यासाठी दामले आणि इतर 17 समविचारी सहकाऱ्यांनी वर्ष 1924 मधे पुण्यात महाराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली.
आपली शरीर संपदा सुदृढ राखण्याची सवय व्हावी तसेच ज्यायोगे सुदृढ, सशक्त, निर्व्यसनी आणि धाडसी तरुण पिढी निर्माण व्हावी असा यामागचा उद्देश होता. महाराष्ट्रीय मंडळाने 1963 ते 1970 या काळात अनेक शाळा स्थापन केल्या. सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूल, पुणे व्यायामशाळा, श्रीमती इंदिराबाई करंदीकर इंग्लिश मीडियम स्कूल आणि कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाला या नावाने या शाळा प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रवेश परीक्षेसाठी मराठी युवकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून खास प्रशिक्षण वर्गही त्यांनी सुरू केले. त्यासाठी आपल्या लष्करातील अनुभवांचा त्यांनी उपयोग करून दिला. ते इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. लष्करात अधिकारी पदावर रूजू होणाऱ्या युवकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे हे ओळखून त्यांनी इंग्रजी बोलण्याचे खास प्रशिक्षण वर्ग सुरू केले. एकदा एका ग्रामीण भागातील शाळेतील समारंभात ते म्हणाले, “मुलांनो, आपले पुढारी मराठीचा वापर झाला पाहिजे असा उपदेश करतात, पण त्यांची मुले मात्र पाचगणी किंवा अन्य ठिकाणी निवासी शाळेतून इंग्रजी माध्यमातून शिकत असतात.
आपली मराठी सर्वांना आवश्यक आहेच; पण जागतिक स्तरावर भविष्यात इंग्रजी महत्त्वाचीच आहे. त्यामुळेच महाराष्ट्रीय मंडळाच्या टिळक रस्ता शाखेच्या परिसरात वर्ष 1964 मधे त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरुवात केली. या शाळेचे नामकरण महाराष्ट्रीय मंडळ इंग्लिश मीडियम स्कूल असे करण्यात आले. एम. एम. स्कूल या नावानेही ही शाळा ओळखली जाते. वर्ष 1932 मध्ये त्यांनी शारीरिक शिक्षण देणारे महाविद्यालय स्थापन करण्याचा संकल्प केला, पण हे स्वप्न प्रत्यक्षात यायला त्यांना तब्बल 45 वर्षे लागली. वर्ष 1977 मध्ये सरकारने 32 एकर जमीन महाराष्ट्रीय मंडळाला दिली आणि गुलटेकडी येथे जुलै 1977 मध्ये चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (सीएपीई) या महाविद्यालयाची स्थापना झाली.
संस्थेचे आश्रयदाते बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचे संस्थापक चंद्रशेखर आगाशे यांचे नाव या महाविद्यालयाला देण्यात आले. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. त्याला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेची (नॅक) मान्यताही आहे तसेच हे महाविद्यालय शारीरिक शिक्षण विषयातील मान्यताप्राप्त संशोधन केंद्रही आहे. शारीरिक शिक्षण या विषयाशी संबंधित एम.फिल.सह अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. 25 जुलै 1977 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.