नवी दिल्ली – हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे स्थान मिळवल्यानंतर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता गमाविलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पुढील वर्षी रांची येथे होणाऱ्या पात्रता स्पर्धेतून ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने (एफआयएच) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा चीनच्या चांगझोऊ येथून रांची येथे हलवली आहे. दुसरीकडे, चीनच्या महिला संघाने या महिन्याच्या सुरुवातीला हॉंगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पॅरिस स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे.
आमच्या खेळाडूंसाठी ही एक मोठी स्पर्धा आहे आणि ती आमच्या घरच्या मैदानावर आयोजित केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. भारतीय चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान सुरक्षित करण्याचा निर्धार असलेल्या आमच्या खेळाडूंना उत्साह मिळेल.
– दिलीप तिर्की, अध्यक्ष, हॉकी इंडिया
त्यामुळे, पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी 13 ते 19 जानेवारी दरम्यान झारखंडमधील रांची येथील मरंग गोमके जयपाल सिंग ऍस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर होणार आहे. पात्रता स्पर्धेत भारताव्यतिरिक्त सात देश सहभागी होतील, त्यापैकी अव्वल तीन देश पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित करतील.
रांचीमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन करणे ही एक चांगली बातमी आहे. घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांसमोर खेळताना आमच्या खेळाडूंचा उत्साह अविस्मरणीय असेल, जे आम्हाला पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त प्रेरणा देईल.
– सविता पुनिया, भारतीय संघाची कर्णधार
“एफआयएच’चे इतर ऑलिम्पिक पात्रता सामने मस्कत, ओमान (पुरुष: 15-21 जानेवारी, 2024) आणि व्हॅलेन्सिया, स्पेन (महिला आणि पुरुष: 13-21 जानेवारी, 2024) येथे खेळविले जातील. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताला यजमान चीनकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर जपानचा 2-1 असा पराभव करून संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.