ओडेन्स (डेन्मार्क) :-ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे शनिवारी येथे डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारीनकडून पराभूत झाल्याने संपुष्टात आले. हा सामना एक तास 13 मिनिटे चालला ज्यामध्ये सिंधूला 18-21, 21-19, 7-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या सुपानिडा कातेथोंगचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने गेल्या आठवड्यातही फिनलंडमध्ये आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती, परंतु तिथेही तीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सिंधूने पहिल्या गेममध्ये चांगली झुंज देताना तो अगदी थोडक्यात 18-21 अशा फरकाने गमाविला. त्यानंतर तिने अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन करताना गेम 21-19 अशा फरकाने जिंकला खरा परंतु अखेरचा निर्णायक सेट तिने 7-21 अशा मोठ्या फरकाने गमाविला.