मुंबई – अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) 24 सप्टेंबरला विवाह बंधनात अडकले. राजस्थानमधील उदयपूरमध्ये त्यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या लग्नाला बॉलीवूडमधील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी उपस्थित राहिले होते. लग्नानंतर आता परिणीती पहिल्यांदाच मालदीवला फिरण्यासाठी गेली आहे .मात्र ती राघवसोबत नाही तर मैत्रिणींबरोबर येथे फिरण्यासाठी गेली आहे.
नुकतेच परिणीतीने सोशल मीडियावर मालदिवमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या हनिमूनच्या चर्चा रंगू नयेत याची परिणीतीने पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. या फोटोंना “मी हनिमूनला आलेली नाही ही आमची गर्ल्स ट्रिप आहे” असं कॅप्शन परिणीतीने दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये परिणीतीच्या हातात कॉफीचा कप, लग्नाचा गुलाबी रंगाचा चुडा आणि सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, लग्नानंतर हे कपल हनिमूनला कुठे जाणार याची चर्चा रंगली होती. मात्र तिने फोटो शेअर करत राघव चड्ढांसोबत नाही तर मैत्रिणींबरोबर फिरण्यासाठी गेल्याचे स्पष्ट केले आहे. परिणितीचे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असल्याने आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनमुळे राघवने बाहेर फिरायला जायची योजना तूर्तास रद्द केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे नवं जोडपे कधी आणि कुठे फिरायला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.