पुणे – करोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागास मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी आता पालिकेकडून लवकरच करार पद्धतीने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत पॅरामेडिकलचे प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे 450 जणांना नियुक्त केले जाणार आहे.
केंद्र शासनाकडून हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 750 जणांची यादी पालिकेस पाठविली असून त्यात हे सुमारे 450 जण पुण्यातील असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
शहरात करोनाच्या रुग्णाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे करोनाच्या रुग्णासह विलगीकरण कक्षातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग नसल्याने पालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी भरतीची मागणी केली होती.
त्याचवेळी केंद्रानेही पालिकेच्या दिमतीला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या पॅरामेडिकल प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीचा आरोग्य विभागासाठी वापर करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही 750 प्रशिक्षणार्थी यादी पालिकेस देण्यात आली आहे. दरम्यान, त्यात पुण्यातील सुमारे साडेचारशे जण आहेत. त्यांना तातडीने संपर्क करण्यात येणार आहे. तसेच करार पद्धतीने त्यांनी या कठीण परिस्थितीत शहरासाठी आरोग्य सेवा द्यावी यासाठी त्यांना संपर्क करून लवकरात लवकर त्यांना करोना नियंत्रणाच्या कामात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.