पिंपरी (प्रतिनिधी) –संचारबंदीचा आदेशाचा भंग करून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या माजी महापौरासह 36 जणांना पोलिसांनी चांगलाच झटका दिला. पोलिसांनी त्यांच्याकडून परेड करून घेतली. तसेच पुढील काळात नियम मोडणार नाही, अशी शपथही घ्यायला लावली. शनिवारी (दि. 18) सकाळी निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. तर मोशी परिसरातही वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई करीत 13 जणांना कोंबडा बनण्याची शिक्षा दिली.
माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह अन्य 36 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 17) मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दहा नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 36 जणांवर कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सूर्यनमस्कार व परेड करून घेतली. तसेच, यापुढील काळात संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ घेण्यास भाग पाडले. तसेच “मी स्वार्थी आहे. करोनाचा फैलवण्यास मदत करीत आहे, असा फलकही यावेळी नागरिकांच्या हाती दिला.
निगडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली असून आगामी काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारे शनिवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी प्राधिकरण येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या 13 जणांवर पोलिसांच्या वाहन चोरी विरोधी पथकाने कारवाई केली. या नागरिकांना पोलिसांनी कोंबडा बनण्याची शिक्षा दिली.