हडपसर, दि. 20 – आज भारत देश या आजी-माजी सैनिकांमुळेच सुरक्षित आहे. नवीन पिढीने सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा केली पाहिजे. सर्व माजी सैनिकांनी तरुणांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन माजी महापौर वैशाली सुनील बनकर यांनी केले.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून हडपसर-गोंधळेनगर जय जवान आवास येथे आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा बनकर यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वीकृत सदस्य अविनाश काळे, सागरराजे भोसले, संजय शिंदे, गणेश बोराटे, सचिन भोसले, शीतल शिंदे, माजी नगरसेवक सुनील बनकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सैनिक सेलचे अध्यक्ष अविनाश ढोले, सोसायटीचे चेअरमन बोरकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केला. यावेळी 125 कुटुंबांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी कर्तव्य बजावताना वेळच्या आठवणी सांगितल्या. तर, युवकांनी देशसेवेसाठी सैन्य दलात जावे. त्याकडेही करिअर म्हणून पाहावे असे मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक नागरिकांचीही उपस्थिती होती.