मंचर -महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना राज्यसरकार प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देणार आहे. त्याचा फायदा राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी बांधकाम कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.