मुंबई : भाजपा नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी धक्कादायक माहिती उघड केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काही उमेदवारांना तिकिट न देण्याचा तो निर्णय दिल्लीतून नाही तर राज्यातून घेण्यात आला होता, असे सांगत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Decision to deny tickets taken in Maharashtra, not in Delhi; Devendra Fadnavis should take responsibility for party’s poll performance: BJP leader Pankaja Munde
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2019
विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्यात आले होते. परंतु काही उमेदवारांना तिकिट नाकारण्यात आले होते. तिकिटच नाकारण्याचा हा निर्णय दिल्लीत घेण्यात आला नसून तो महाराष्ट्रात घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. मी भाजपा सोडणार आहे या वावड्या कुठून आल्या? असा सवालही मुंडे यांनी केला. मी नाराज नसून अशा वावड्या मी पक्ष सोडावा यासाठी जाणीवपूर्वक सोडल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.
आपली कोणत्याही पदासाठी पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची चर्चा नसल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने स्थापन केलेल्या सरकारवरही भाष्य केले. विचारधारा मानणाऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच आपण नव्या सरकारवर टीका करणार नाही. आम्ही सर्वांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला जवळून पाहिले आहे. त्यांनी पक्षवाढीसाठी कायम प्रयत्न केले. जर कोणी दुखवत असेल तर त्याला ते पहिले जवळ करत असते असे म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्यात ज्या प्रकारचे यश अपेक्षित होते, ते मिळाले नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायला हवी. माझ्या विरोधात दोन उमेदवार असते तर माझा पराभव झाला नसता. राज्यात आमचे सरकार असतानाही धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेता म्हणून आवश्यक ती सर्व मदत मिळाली, असेही त्या यावेळी म्हणाल्या.