कर्ज फेडण्यासाठी ‘तिने’ रचला चोरीचा बनाव

पिंपरी – कर्ज फेडण्यासाठी महिला केअरटेकरने वृद्ध मालकिणीच्या हातातील सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या. त्यानंतर एका अनोळखी एलआयसी एजंटने बांगड्या काढून नेल्याचा बोभाटा केला. तसेच या प्रकरणात केअरटेकरने स्वतः फिर्याद देखील दिली. मात्र, पोलिसांनी तिचे बिंग फोडले. फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न करून केअरटेकर महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

रंजना सुरेश उत्तेकर (वय 40, रा. रुपीनगर, निगडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्या महिलेचे नाव आहे. आरोपी रंजना ही महिला ग्यानीबाई मूलचंद रामनानी (वय 88) यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करत होती. 2 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून एका चोरट्याने घरातील वृद्ध महिलेच्या हातातून एक लाख 30 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून नेल्या. अशी फिर्याद आरोपी रंजना हिने दिली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी पोलिसांनी परिसराची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच ग्यानीबाई यांचा देखील जबाब घेतला. मात्र, त्यांच्यासोबत असा प्रकार झाला नसल्याचे त्यांनी आपल्या जबाबात सांगितले. त्यामुळे पोलिसांचा रंजना हिच्याबाबत संशय बळावला. त्यामुळे रंजनाला पोलीस ठाण्यात बोलावून तिच्याकडे कसून चौकशी केली. पोलिसांच्या प्रश्‍नांसमोर टिकाव लागला नाही अन्‌ तिने गुन्ह्याची कबुली दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.