नीलकंठ मोहिते
इंदापूर – खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अडचणीतील महत्त्वाची अडचण म्हणजे पाणंद रस्ते असतात. अनेक वर्षापासून या पाणंद रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना कायमचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रात्रंदिवस शेतीत राबणारा शेतकरी या पाणंद रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांची शिकार बनतो. यातूनच पूर्व परंपरागत वाद, वाहतुकीची अडचण अशा कोंडीत शेतकरी सातत्याने असतो. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेतरस्ते योजनेतून शंभर किलोमीटर अंतराचे पाणंद रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे.
अनेक गावात पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागते. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी तर रस्त्यांअभावी आपली शेती न कसता पडीक ठेवली आहे; मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांची शेती नापिक राहू नये, यासाठी शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी या योजनेतून अडगळीत पडलेल्या पाणंद रस्त्यांना न्याय मिळाला आहे. भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील 72 ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी घेतली आहे.
तालुक्यात जवळपास 98.5 किलोमीटर अंतराचे रस्ते करण्यात येणार आहेत. या रस्त्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामासाठी प्रत्येक किलोमीटर करिता साधारणपणे 25 लाख इतका कमी अधिक प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च असतो. याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील पाणंद रस्त्याकरिता जवळपास 25 कोटी रुपये इतक्या किमतीचे रस्ते होण्यास मदत होईल. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होईल.
येथे होणार रस्ते
अंथुर्णे (3 किलो मिटर), अजोती (1.5), कचरवाडी (2), कडबनवाडी (4), काझड (4.5), कळंब (1), कळस (1.5), कालठण नंबर 2 (3.5), कुरवली (2), गोतंडी (5), गिरवी (2), चाकाटी (7), निमगाव केतकी (4.5), जाधववाडी (1.5), जाचकवस्ती (1.5) झगडेवाडी (5), लोणी देवकर (1), वडापुरी (1.5), वरकुटे खुर्द (2.5), शहा (1.5), शेळगाव (1), सणसर (1.5), सपकळवाडी (1.5), सरडेवाडी (1.5), सराफवाडी (1.5), हागारेवाडी (1), पिंपरी बु. (1.5), पिटकेश्वर (अर्धा), पिठेवाडी (2), पोंधवडी (1.5), बाभूळगाव (2), बिजवडी (अर्धा), मदनवाडी (1), माळवाडी (1.5), लाकडी (1.5), लासुर्णे (1.5), लुमेवाडी (2), तक्रारवाडी (1.5), तरटगाव (1.5), निमसाखर (5.5), पिंपरी खुर्द (3), निरगुडे (1.5), निरनिमगाव (1.5), न्हावी (2), पंधारवाडी (1) व पळसदेव (1.5) येथे रस्ते होणार आहेत.