पुणे- “कामाची ऑर्डर निघाली तर बरं होईल…”बिलावर सह्या झाल्या की नाही तेवढं अधिकाऱ्याला विचारा की… यांसह दादा, ताई, काका करत “तुमच्या कामांच्या यादीत आमच्या गावाचेही नाव घ्यावे,’ यासाठी सदस्यांसह ग्रामीणमधील हौश्या-नवश्यांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली आहे. दि. 21 मार्चला जिल्हा परिषदेवर “प्रशासक राज’ येणार आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांकडे अवघे 4 दिवस राहिले असून, या दिवसात जेवढे झोळीत पाडता येईल ते पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे.
13 तालुक्यांमधील पंचायत समितीवर सोमवारपासून प्रशासक कारभार पाहणार आहेत. त्यामुळे साहजिकच येथील वर्दळ कमी होणार. आता जिल्हा परिषदेच्या कोट्यातून काही कामे पदरात पडतात का? यासाठी सदस्यांसह कार्यकर्ते गर्दी करत आहेत. जिल्हा परिषद सदस्यांची मुदत 20 मार्चला संपत आहे. त्यामुळे 21 मार्चला प्रशासक म्हणून सर्व सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे येतील. त्यामुळे सदस्यांकडे सात दिवस असले तरी त्यातील शनिवार आणि रविवार सुट्टीचे, तर धुलिवंदन शुक्रवारी असल्यामुळे आठवड्यातील तीन दिवस सुट्टीचे आहेत. त्यामुळे सदस्यांकडे अवघे चार दिवस राहिले आहेत.
सध्या बांधकाम विभागात वर्क ऑर्डर घेण्यासाठी आणि बिलाच्या फाइलवर सह्या करून घेण्यासाठी ठेकेदारांची गर्दी वाढल्याचे दिसून येते. तर विकासकामांच्या यादीमध्ये आपले कामे घेतले का? निधी किती दिला हे पाहण्यासाठी सदस्यांकडून पदाधिकारी व अधिकाऱ्यांना फोनवरून, प्रत्यक्ष भेटून विचारणा केली जात आहे. शेवटच्या टप्यात आणखीन काही कामे पदरात पडतात का? यासाठी मर्जितले मान्यवर, कार्यकर्ते आणि ठेकेदार पदाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये ठाण मांडून बसल्याचे चित्र मागील आठ दिवसांपासून दिसून येत आहे. तसेच बांधकाम, आरोग्य, समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभागातही गर्दी वाढलेली आहे.