पळशीकरांना उरमोडीच्या पाण्याबाबत ठेंगा

 मनकर्णवाडीपर्यंतच पाणी सोडलं : गावात पाण्याची टंचाई

नामवंत राजकारण्याचा नेहमीच पळशीला विरोध
पळशी परिसरातील माणगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उरमोडीच्या पाण्याने भरण्याची गरज आहे. गेल्या दहा दिवसांत मनकर्णवाडीपर्यंत आलेले पाणी एका राजकारण्याच्या हट्टापायी सोडले नाही. गोंदवले खुर्द, लोधवडे येथील चव्हाणमामा व मणकर्णवाडीचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरला. मात्र तेथून पळशीला पाणी का येऊन दिलं नाही? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे. लोक पाणीपट्टी भरण्यास तयार असून हा राजकारणी पळशीला विरोध करत असल्याच्या तक्रारी आहेत.

पळशी – पळशी, ता. माण या गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. हे गाव पिण्याच्या पाण्यासाठी रडारवर आले आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी उरमोडी पाणी योजनेचे पाणी माणगंगा नदीत सोडून नदीवरील बंधारे भरण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

सध्या उरमोडी योजनेचे पाणी पिंगळी तलावात सोडून पुन्हा गोंदवले खुर्द व लोधवडे तलावात सोडण्यात आले. तसेच ढाकणी तलावात पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. माण तालुक्‍यात मोठ्या लोकसंख्येचे असलेले पळशी गाव आहे. गावाचा वाड्या-वस्त्यांचा विस्तार मोठा आहे. तसेच गावात शेतकऱ्यांचे दुग्ध व्यवसायाचे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे.

गावासह परिसरातील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत तर बोअरवेलचे पाणी आटून गेले आहे. पाण्याचा कोणताही स्रोत शिल्लक राहिला नाही. नागरिकांबरोबर जनावरांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. माणगंगा नदीवर असलेले सिमेंट साखळी बंधारे व दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे असून उरमोडी पाणी योजनेतील पाण्याने भरले तर गावठाण तसेच नदीकाठच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

सध्या घाडगे वस्ती, माने वस्ती, मुगदेवस्ती, पंचभाई वस्ती, केरूनानांचा मळा, हांगेवस्ती, माळवे वस्ती, संपूर्ण गावठाण, गंबरे आळी, पिराची टेकडी, साबळेवस्ती येथे भीषण पाणी टंचाई सुरू आहे. प्रशासन व ग्रामपंचायत यांचे या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष आहे. गाव व वाड्यावस्त्यांवर टॅंकरची मागणी असताना पळशी गावात तो पुरवला जात नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यासाठी ढाकणी पाठोपाठ माणगंगा नदीत उरमोडी योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वाढू लागली आहे. गावठाणाला पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. आडात नाही तर पोहऱ्यात कसे येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.