पर्यटक, हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक

“ओयो’विरोधात महाबळेश्‍वरमध्ये संताप : व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती
महाबळेश्‍वर –
हॉटेलमध्ये रूमचे ऑनलाइन आरक्षणाची सुविधा पुरविणारे ओयो या कंपनीकडून पर्यटकांची व हॉटेल मालकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात येत असल्याने पर्यटक व हॉटेल मालक त्रस्त झाले आहेत. ऐन हंगामात ओयो कंपनीच्या या भ्रष्ट कारभारामुळे महाबळेश्‍वर येथील हॉटेल इंडस्ट्री बदनाम होत असून याचा येथील हॉटेल व्यवसायावर विपरीत परीणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हॉटेलमध्ये ऑनलाइन रूम बुकिंगची सुविधा पुरविणारे विविध कंपन्यांचे मोबाइल ऍप असून या सर्व कंपन्यांमध्ये दराची तीव्र स्पर्धा आहे. सर्वात स्वस्त रूम देण्याची जाहिरात करून ओयो कंपनी अनेकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. कमी दराला बळी पडलेल्या अनेक पर्यटकांची फसवणूक झाल्याचे प्रकार येथे उघडकीस आले असून त्यापैकी काही पर्यटकांनी तर थेट पोलिसात तक्रार नोंद केली आहे. सध्या महाबळेश्‍वर येथे उन्हाळी हंगाम सुरू असून येथे रोज मोठ्या प्रमाणावर पर्यटक सहलीसाठी येत आहेत, अशा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून अगदी सकाळच्या नाश्‍त्यासह चारशे रुपयात एसी रूम देण्याचे आमिष ही आयो कंपनी दाखवित आहे. अनेक पर्यटक ओयो ऍपवरून आपल्या घरी बसून चारशे ते पाचशे रुपयात रूम बुक करीत आहेत.

बुकिंग प्रमाणे ते जेव्हा येथील आरक्षण केलेल्या हॉटेलमध्ये पोहचतात तेव्हा तेथे त्यांना इतक्‍या कमी दरात रूम देण्यास अनेक हॉटेल चालक तयार होत नाही. कारण त्यांना इतक्‍या कमी दरात रूम देणे परवडत नाही. हॉटेल व्यावसायिकांना जर परवडत नाही तर मग ही कंपनी इतक्‍या कमी दरात आरक्षण घेतेच कशी? हा प्रश्‍न येथे फसवणूक झालेल्या पर्यटकांना पडला आहे. चारशे ते पाचशे रुपयात रूम बुकिंग करूनही रूम मिळत नसल्याने त्यांना येथे हजार ते बाराशे रुपये खर्च करावे लागत आहेत. काही ठिकाणी जर पर्यटकांना आरक्षणाप्रमाणे रूम दिला तर त्या हॉटेल व्यावसायिकांना ओयो कंपनी वेळेवर रक्कम देत नाही. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांचीही “ओयो’ कंपनीकडून फसवणूक केली जात आहे

आपल्याचकडे हॉटेलचे आरक्षण पर्यटकांनी करावे यासाठी ओयो कंपनी हॉटेल शहरापासून कितीही लांब असले तरी त्याचा पत्ता महाबळेश्‍वरमध्येच दाखविते. प्रत्यक्षात हॉटेल महाबळेश्‍वरपासून वीस ते पंचवीस किमी लांब देखील असते. पांचगणी परिसरातील हॉटेल देखील महाबळेश्‍वरच्या पत्त्यावर दाखवून त्या हॉटेलचे आरक्षण ही कंपनी करते.
पाचगणीप्रमाणे वाई पाचगणीच्या जवळपास असलेल्या खेड्यातील हॉटेलचे आरक्षणही ओयो कंपनी महाबळेश्‍वरचा पत्ता देऊन पर्यटकांचे आरक्षण करण्यात येते. महाबळेश्‍वर येथे आल्यानंतर अनेक पर्यटकांना जेव्हा पुन्हा पाचगणीला जाण्याची वेळ येते तेव्हा पर्यटकांना डोक्‍यावर हात मारावा लागत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.