आदिवासी शाळेतील धान्यात पालीची विष्ठा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर : संबंधितांवर कारवाईची पालकांची मागणी

भीमाशंकर – आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव येथील आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भोजन बनविण्यासाठी ठेकेदाराने खरेदी केलेल्या धान्यात उंदीर आणि पालीची विष्ठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच शाळेत सर्वत्र दुर्गंधी असून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

राज्यात आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे, यासाठी 10 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या शाळेत अद्याप इंग्रजीचे शिक्षक देण्यात शासन अपयशी ठरले आहे. येथील शिक्षक, कर्मचारी हे स्थानिक पुढारी यांचे स्नेही असल्याने त्यांना आदिवासींचे काही एक घेणे नाही. शाळेच्या इमारतीसाठी सुमारे 38 कोटींचा निधी दिला होता, परंतु कर्मचारी व शिक्षकांची मात्र भरती केली नाही. घोडेगाव प्रकल्प कार्यालयाअंर्तगत 5 जिल्ह्यांचा कारभार चालतो. यात 23 शासकीय आश्रमशाळा व काही अनुदानित आश्रमशाळा आणि घोडेगाव कार्यालयालगत इंग्रजी माध्यमाची शासकीय शाळा सुरू आहे.

शाळेतील गैरकामांबाबत पालकांनी अनेकवेळा तक्रार केल्या होत्या, परंतु मुख्याध्यपक, अधिक्षक, शालेय शिक्षण समितीने याकडे दुर्लक्ष केले. तक्रार करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या शाळेतील अनेक विद्यार्थी रात्रीच्या वेळी बाहेर फिरताना दिसले आहेत. त्यांनतर प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष संदीप साबळे व अन्य सदस्यांनी गेल्या वर्षी दोन वेळा शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली होती.

शाळेच्या संबंधित मुख्याध्यपकांनी याकडे गांर्भीयाने लक्ष्य न देता चालू शैक्षणिक वर्षातही यामध्ये सुधारणा केली नाही. गेल्या वर्षी काही पालकांनी आदिवासी मंत्री, सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मंत्र्यांनी शाळेची पाहणी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविले होते. यामध्ये मुख्याध्यापक दोषी आढळून आले होते. तरीही अद्याप संबंधितांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

बेशिस्त वागणे, मुलांची गैरसोय केल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अधिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. काही दोषी शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.
– नंदीनी आवाडे, घोडेगाव प्रकल्प अधिकारी


घोडेगाव येथे अदिवासी मुलांची इंग्रजी माध्यमाची ही राज्यातील पहिली प्रायोगिक शाळा आहे. शाळेतील मुख्याध्यापक व अधिक्षकांचे मुलांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी देखील मिळत नाही.
– संदीप साबळे, अध्यक्ष अदिवासी शैक्षणिक प्रकल्पस्तरीय समिती

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.