इच्छुकांच्या जोर बैठका; शिरूर-हवेलीत मोर्चेबांधणीला गती

– प्रमोल कुसेकर

मांडवगण फराटा – शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आताच गावे पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. विधानसभेच्या मैदानासाठी जोर-बैठकांना सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इच्छुकांना विधानसभेचे वेध लागले आहेत. इच्छुकांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, जयंत्या, मयंत्या, दशक्रिया विधी, लग्न समारंभ आणि विकासकामांच्या माध्यमातून संपर्क वाढविला आहे.

मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन प्रमुख पक्षांचा प्रभाव आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारीसाठी गेल्या काही महिन्यापासून खडाखडी सुरू आहे. त्यामुळे इच्छुकांनी “एकला चलो रे’ ची भूमिका घेत संपर्क ठेवला आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दोन वर्षांपासून विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. माजी आमदार अशोक पवार व मंगलदास बांदल यांनी निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. कंद यांनी शिरूरच्या पूर्व भागात जनसंपर्क वाढविला आहे. अशोक पवार यांचेही शिरूरप्रमाणे हवेलीत वैयक्‍तिक संपर्क आहे. यामध्ये भाजपकडून आमदार बाबुराव पाचर्णे हेच प्रबळ दावेदार आहेत. कंद व आमदार पाचर्णे यांच्या समर्थकांकडून घोडगंगाचे अध्यक्ष अशोक पवार यांना कारखान्यातील विविध प्रश्‍नावर वारंवार कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवार व कंद यांच्यातील दुरावा कमी करण्याबाबत पक्ष पातळीवर प्रयत्न होत नसल्याने दोघेही निवडणूक लढविणार, असे चित्र आहे.

परंतु पक्ष अधिकृत उमेदवारी कोणाला देणार याबाबत अजूनही दोघांनाही खात्री नाही. विधानसभेला शिवसेना भाजप युती न झाल्यास शिवसेना जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जात आहे. अशोक पवार यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला यश मिळवून दिले आहे. मूळचे लोणीकंदचे कंद यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निवडणुकांत पक्षाला यश मिळवून दिले आहे. वाडेबोल्हाई पंचायत समिती पोटनिवडणुकीत मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करता आले नाही, हे त्याचे अपयश मानले जात आहे. तरी यावेळी निवडणूक लढवणारच असा चंगच त्यांनी बांधला आहे. कंद हे शिरुर तालुका पिंजून काढत आहेत.

उसाचा कमी बाजारभाव व एफआरपीबाबत शेतकऱ्यांची नाराजी ही अशोक पवार यांच्या दृष्टीने डोकेदुखी आहे. मागील सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीला मिळालेले यश व कार्यकर्त्यांचे योग्य संघटन या दोन्ही गोष्टी उमेदवारी मिळविण्यासाठी पवार यांना जमेच्या बाजू ठरू शकतात.

कंद यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिरूर तालुक्‍याच्या प्रत्येक गावांत अनेक विकासकामे केली आहेत. उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या हायकमांडने वेळ आल्यावर उमेदवारी जाहीर करु, असा पवित्रा घेतला आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी न मिळाल्यास आता थांबायचे नाही तर निवडणूक लढवायचीच, अशी स्थितीत आहेत. उमेदवारी न मिळाल्यास नेमके कोणत्या पक्षाकडून लढणार की अपक्ष लढणार याबाबत इच्छुक भाष्य करण्यास तयार नाहीत.

आमदार पाचर्णे यांनी शिरुर मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चासकमानच्या पाण्याबाबत लोकांची नाराजी ही त्यांची कमीपणाची बाजू आहे. यावेळी अपक्ष म्हणून क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष संजय पाचंगे हे विधानसभेला नशिब आजमावणार आहे. सध्या इच्छुकांकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे.

आता थांबायचे नाही रे गड्या
सर्वच इच्छुक विधानसभेसाठी आता नाही तर कधीच नाही, या भावनेने कामाला लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या इच्छुकांच्या कामाची माहीती पुरविली जात आहे. विरोधकांबाबत वेगवेगळ्या पोस्ट टाकून लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रमुख कार्यकर्त्यांना एकत्र करून रिचार्ज करीत आहेत. आता थांबायचे नाही रे, गड्या थांबायचे नाही, असा संदेश इच्छुक कार्यकर्त्यांना देत असल्यामुळे कार्यकर्तेही आपल्या नेत्याला विधानसभेत पाठविण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे चुरस वाढणार आहे. अर्धा डझन इच्छुक असल्यामुळे कार्यकर्त्यांची खेचाखेची सुरू आहे. इच्छुकांकडून सरबराई सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)