जेरुसलेम (इस्रायल) – इस्रायली सैन्याने वेस्ट बॅंक भागामध्ये घातलेल्या छाप्यात एक पॅलेस्टिनी दहशतवादी ठार झाला आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली.
तुबास शहराच्या जवळ इस्रायली सैन्याने कारवाईसाठी हा छापा घातला होता. पॅलेस्टीनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी गेल्या काही महिन्यांपासून शोधमोहिम सुरू होती. त्या मोहिमेचा भाग म्हणून हा छापा घालण्यात आल्याचे इस्रायलच्या सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण वेस्ट बॅंक भागामध्ये ही छाप्याची कारवाई करण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेस्ट बॅंकच्या उत्तरेकडील शरणार्थ्यांसाठीच्या छावणीमध्ये इस्रायली सैन्याने छापा घातला तेंव्हा त्यांच्यावर जोरदार गोळीबार झाला. इस्रायली सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात युनिस घसान तायेह हा 21 वर्षांचा युवक ठार झाला. ताहेह हा इस्रायली सैन्यावर बॉम्ब फेकण्याच्या प्रयत्नात असताना मारला गेल्याचे इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे. तायेह याला पॅलेस्टिनी सैन्याने हुतात्मा म्हणून संबोधले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल वेस्ट बॅंकेत दररोज अशाप्रकारचे छापे घालत आहे. या वर्षाच्या प्रारंभी इस्रायलवर करण्यात आलेल्या घातक हल्ल्यांमध्ये 19 जण मारले गेले होते. तेंव्हापासून इस्रायलने ही मोहिम सुरू केली आहे.