तेल अविब – इस्रायली लष्कर आणि पॅलेस्टाईनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील लष्करी संघर्ष गेले काही महिने सुरू आहे आणि त्याबाबत विविध प्रकारच्या बातम्याही समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीप्रमाणे इस्त्राईलच्या लष्कराचा भाग नसतानाही दोन महिने या लष्करात सामील होऊन हमास संघटनेशी लढण्याचे काम एका इस्त्रायली तरुणाने केले. पण त्याची ही वेगळ्या प्रकारची देशभक्ती लक्षात आल्यावर इस्त्राईल सरकारने त्याच्यावर तोतयेगिरीबद्दल कारवाई केली आहे.
ओय इफरच असे या 35 वर्षे तरुणाचे नाव असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हमास संघटनेने जेव्हा इस्त्रालवर हल्ला केला होता. त्यानंतर देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच परिस्थितीचा फायदा घेऊन या तरुणाने इस्रायल लष्कराचा गणवेश दारूगोळा आणि काही दळणवळणाची उपकरणे चोरली आपण लष्कराचेच एक जवान आहोत असे भासवून तो लष्कराच्या जवानांबरोबर राहू लागला. तब्बल दोन महिने त्याने हमास दहशतवादी संघटनेच्या विरोधातील कारवाईत भाग घेतला. गाझापट्टीमध्येही त्याचा वावर होता.
एवढेच नाही तर, पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू गाजापट्टीमध्ये भेट द्यायला गेले होते तेव्हा त्यांच्यासोबतच या तरुणाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. तब्बल दोन महिन्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये इफराच याची तोतयेगिरी उघडकीस आल्यावर इस्त्राईल लष्कराने त्याला अटक केले आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, शस्त्रे जप्त केली. केवळ देशभक्तीच्या भावनेतूनच त्याने हा गुन्हा केल्याची माहिती त्याच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. या लष्करी संघर्षात वैद्यकीय पथकाचा एक भाग म्हणून जाण्याची त्याची इच्छा होती. पण अचानक त्याला ही लष्करी सामग्री सापडल्याने त्याने प्रत्यक्ष लष्करी संघर्षात भाग घेतला, अशी माहिती वकिलांनी दिली आहे.