लाहोर – कर्णधार बाबर आझमच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान पाकिस्तानने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 38 धावांनी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामनाही पाकिस्तानने जिंकला होता, त्यामुळे आता त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दमदार शतकी खेळी केली. त्याचे टी-20 क्रिकेटमधील हे तिसरे शतक ठरले तर कर्णधार म्हणून या क्रिकेटमध्ये तीन शतके फटकावणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
बाबरने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी करताना 11 चौकार व 3 षटकार फटकावले. त्याच्या खेळीमुळे पाकिस्तानने 20 षटकांत 4 गडी बाद 192 धावा केल्या. पहिल्या सामन्याप्रमाणे याही लढतीत न्यूझीलंडची फलंदाजी अपयशी ठरली. त्यांचा डाव 20 षटकांत 7 बाद 154 धावांवर रोखला गेला.
पाकिस्तानकडून हॅरीस रौफने पुन्हा 4 बळी मिळवले. टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 4 शतके फटकावली आहेत. तसेच सूर्यकुमार यादव, कॉलिन मुनरो, एस डेविजी, ग्लेन मॅक्सवेल यांनी आतापर्यंत 3 शतके नोंदवली असून त्यांच्याच पंक्तीत बाबरचा समावेश झाला आहे.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान – 20 षटकांत 4 बाद 192 धावा. (बाबर आझम नाबाद 101, महंमद रिझवान 50, इफ्तेकार अहमद नाबाद 33, मॅट हेनरी 2-29). न्यूझीलंड – 20 षटकांत 7 बाद 154 धावा. (मार्क चॅपमन नाबाद 65, चॅड बोव्ह 26, हॅरिस रौफ 4-27).