इस्लामाबाद :- पाकिस्तानातील फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात “एफआयए’चे उपसंचालक इमानुल्लाह खान यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाब प्रांतातील मोहल्लाह मिर वालिखेल येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
यावेळी खान यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत, असे खान यांच्या बंधूंनी सांगितले. खान आणि त्यांचे कुटुंबीय घराचे बांधकाम तपासत असताना हा हल्ला झाला.
शरीफुल्लाह आणि अली बहादर अशी या मारेकऱ्यांची नावे आहेत. याच दोघांनी गुरुवारी खान यांच्या कुटुंबातील एका अन्य सदस्यावरही हल्ला केला होता. मात्र या दोघांशी आपल्या कुटुंबाचे काही वैर नव्हते, असे खान यांच्या बंधूंनी म्हटले आहे.
पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यावर यापूर्वीही प्राणघातक हल्ले झाले आहेत. अशाच हल्ल्यांमध्ये अलीकडेच तीन पोलीस अधिकाऱ्यांचीही हत्या झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 पोलिसांची हत्या झाली होती तर अन्य 20 जणांचे अपहरण झाले होते.