रावलपिंडी : शान मसूद, बाबर आझम यांच्या शतकी आणि नसीम शाहच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि ४४ धावांनी पराभव करत विजय नोंदविला आहे. या विजयासह पाकिस्तानने दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकचा गोलंदाज नसीम शाह सामन्याचा मानकरी ठरला.
Bangladesh lost the first Test against Pakistan by an innings and 44 runs.#BANvPAK pic.twitter.com/4k1OkXxZIV
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 10, 2020
पाकिस्तान नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना बांगलादेशला प्रथम फलंदाजीस केलं होते. त्यानंतर बांगलादेशने फलंदाजी करताना मोहम्मद मिथुनच्या ६३, नजमुल होसैनच्या ४४, लिटन दासच्या ३३ आणि मोमिनुल हकच्या ३० धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद २३३ धावा केल्या होत्या. पाककडून गोलंदाजीत शाहीन अफरीदीने ४, मोहमद अब्बास आणि हारिस सोहैलने प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर प्रत्युत्तरात पाकने पहिल्या डावात सर्वबाद ४४५ धावा करत बांगलादेशवर २१२ धावांची आघाडी घेतली. पाककडून फलंदाजीत बाबर आझमने १४३, शान मसूदने १००, हारिस सोहैलने ७५ आणि असद शफीफने ६५ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून रूबेल हुसैन आणि अबु जाएदने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तैजुम ईस्लामने २ तर एबादत हौसैनने १ गडी बाद केला.
त्यानंतर २१२ धावांच्या पिछाडीनंतर बांगलादेशचा दुसरा डाव १६८ धावसंख्येवरच आटोपला आणि त्यांना १ डाव ४४ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुस-या डावात बांगलादेशकडून नजमुल होसैनने ३८, मोमिनुल हकने ४१ आणि तमीम इकबालने ३४ आणि लिटन दासने २९ धावांची खेळी केली. पाककडून गोलंदाजीत दुस-या डावात नसीम शाह आणि यासीर शाहने प्रत्येकी ४ गडी बाद केले.