इस्लामाबाद – पाकिस्तानात गुरूवारी जमीयत उलेमा-ए-इस्लामच्या अंसारुल इस्लाम नावाच्या संघटनेच्या सदस्यांनी संसद परिसरात गुरूवारी घुसखोरी केली होती. पण इस्लामाबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत या संघटनेच्या सदस्यांना अटक केली.
संघटनेच्या आणखी काही जणांना पुढील काही तासांत अटक होण्याची शक्यता आहे. कडेकोट बंदोबस्तात इस्लामाबादमध्ये असलेल्या अनेक खासदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्याचे वृत्त तेव्हा देण्यात आले होते व तणाव निवळला होता.
या प्रकरणात डी-चौक येथील पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याच अधिकाऱ्याने केलेल्या मदतीमुळे अंसारुल इस्लामच्या सदस्यांनी संसद परिसरात घुसखोरी केली होती. पण संसद परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज बघून थेट इस्लामाबाद पोलीस मुख्यालयातून वेगाने हालचाली सुरू झाल्या. पोलीस महानिरीक्षक मुहम्मद अहसान यूनुस यांच्या देखरेखीत कारवाई झाली.
ही कारवाई सुरू असताना पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) आघाडीचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना इस्लामाबादमध्ये जमा होण्याचा आणि शहरातील वाहतुकीचे मुख्य मार्ग अडवून धरण्याचा आदेश दिला आहे. पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी वाहतुकीचे मार्ग अडवून आंदोलन करण्याचा आदेश मौलाना फजलुर रहमान यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
पाकिस्तान सरकार करत असलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारपर्यंत स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी अंसारुल इस्लामचे कार्यकर्ते संसद परिसरात गेले होते. पण पोलिसांनी त्यांना बोलू न देता अटक केली, असे मौलाना फजलुर रहमान यांनी सांगितले. तर अंसारुल इस्लामच्या सदस्यांनी संसद परिसरात बेकायदा घुसखोरी केली होती, असे पाकिस्तान सरकारने सांगितले.