#ICCWorldCup2019 : पाकिस्तानचा इंग्लंडवर 14 धावांनी विजय

अकरा सामन्यांनंतर पाकिस्तानने चाखली विजयाची चव

लंडन – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने इंग्लंडचा 14 धावांनी पराभव करत 11 सामन्यांनंतर विजयाची चव चाखली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 348 धावांची मजल मारत इंग्लंडसमोर 349 धावांचे लक्ष्य ठेवले प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडला निर्धारित 50 षटकांत 9 बाद 334 धावांचीच मजल मारता आली.

349 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय 8 धावा करून परतल्यानंतर बेयरस्ट्रो आणि जो रुट यांनी 7.2 षटकांत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र, 32 धावा करून बेयरस्ट्रो परतल्याने इंग्लंडला 60 धावांवर दुसरा धक्‍का बसला. तर, कर्णधार इऑन मॉर्गन देखील केवळ 9 धावा करून परतल्याने इंग्लंडचा डाव अडचणीत सापडला.

यानंतर आलेल्या जोस बटलरला साथीत घेत जो रुटने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. या दोघांनीही सावध फलंदाजी करत भागीदारी करण्यावर भर दिला. त्यामुळे इंग्लंडने 25.3 षटकांत 150 धावांची तर 31.3 षटकांत 200 धावांची मजल ओलांडली. यावेळी जो रुटने फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर तो लागलीच परतल्याने इंग्लंडला मोठा धक्‍का बसला.

रुटने 107 धावांची खेळी केली. रुट प्रमाणेच बटलरनेही फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. मात्र, तोही शतकानंतर लागलीच परतला. बटलरने 103 धावा केल्या. दोन्ही सेट झालेले फलंदाज परतल्यानंतर ख्रिस वोक्‍सने मोईन अलीच्या साथीत विजयासाठी थोडेफार प्रयत्न केले. मात्र, वहाब रियाझने दोघांना लागोपाठ बाद केल्याने इंग्लंडच्या विजयाच्या आशा मावळल्या.

तत्पूर्वी पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि फकर जमान यांनी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्‍सच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत संघाला सहाच्या धावगतीने धावा करून देत संघाला 7.2 षटकांतच अर्धशतकी तर दहा षटकांत 69 धावांची मजल मारून दिली. मात्र, मोईन अलीने फकर जमानला बाद करत ही सलामीची जोडी फोडली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली होती. फकर जमान बाद झाल्यानंतर आलेल्या बाबर आझमला साथीत घेत इमामने संघाचा डाव सावरत अठराव्या षटकांत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र, संघाच्या 111 धावा झाल्या असतान इमाम बाद झाला.

दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर मोहम्मद हाफिज आणि बाबर आझम यांनी सामन्याची सर्वसूत्रे आपल्या हाती घेत संघाचा डाव सावरत 33व्या षटकांत पाकिस्तानला द्विशतकी मजल मारून दिली. दरम्यान, बाबर आझमने आपले अर्धशतकही पूर्ण केले होते. मात्र, ऐन भरात असलेल्या बाबर आझमला बाद करत मोईन अलीने पुन्हा एकदा पाकिस्तानला धक्का दिला. बाबरने 63 धावा केल्या.

आझम बाद झाल्यानंतर मोहम्मद हाफिजने आक्रमक फलंदाजी करत 62 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकार मारत 84 धावांची आक्रमक खेळी केली. हाफिझ बाद झाल्यानंतर कर्णधार सर्फराज अहमदने इतर फलंदाजांना हाती घेत पाकिस्तानला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, आपल्या अर्धशतकानंतर तोही परतल्यानंतर हसन आली आणि शाबाद खान यांनी पाकिस्तानला 348 धावांची मजल मारून दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.