पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – नागापूर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्रामिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथील कृषीदुत यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.
सिद्धांत वाघमारे, वेदांत बारणे, अनिकेत भुजबळ, केतन वाघमारे, ओंकार केंगार या कृषीदूतांकडून ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांमधे घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद दिला. उत्कृष्ट चित्र काढणार्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार व सहशिक्षिका निशा बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृषीदूतांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा सन्मान करण्यात आला. उपक्रमासाठी महविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. बी. व्ही. खोब्रागडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. जे. खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.