पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील ७० शाळांतील १,५०० विद्यार्थी, शिक्षक व पालक स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी दिव्या चव्हाण, व्यंकटेश चिरमुल्ला, रमेश गायकवाड, रणजित हारपुडे , नितीन जाधव, महासंघाचे अध्यक्ष नारायण शिंदे, जितेंद्र पायगुडे, विकास थिटे, ज्ञानेश्वर गायकवाड व संदीप सातपुते उपस्थित होते. पालकांसाठी माझा पाल्य माझी जबाबदारी, कचरा व्यवस्थापन माझी जबाबदारी, शिक्षण व्यवस्थेकडून माझ्या अपेक्षा हे तीन निबंधाचे विषय होते.
विविध शाळांच्या १५० पालकांनी निबंधाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. निबंध स्पर्धेतही दोनशे शिक्षक व शंभर विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. उर्वरित विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटत आपले कल्पनाविश्व कागदावर उमटवले.
माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत दि. २३ मार्च रोजी बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख सोपान बंदावणे, रेवणनाथ पवार यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत किंद्रे, उत्तम कांगुणे, संजय घोडके, सुदाम करंजावणे, मारुती माळवदकर, नीलिमा लांजेवार, झेंडे ,विजय गडदरे, मोहन पवार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.