पिंपरी, (प्रतिनिधी) – रविवारच्या सट्टीचे औचित्य साधत, मोशी येथील महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024’ ला दोन लाखाहून अधिक विद्यार्थी, नागरिकांनी भेट देऊन लष्करी शस्त्र सामग्री आणि तंत्रज्ञान प्रणालींची माहिती करून घेतली.
प्रदर्शनाच्या तिन्ही दिवशी दररोज एक याप्रमाणे तिन्ही भारतीय सैन्यदलाचे प्रमुख तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ भेट देत आहेत. त्यांच्या भेटी आणि संवादामुळे विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक भारावून गेले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, हवाई दल प्रमुख व्ही.आर.चौधरी, सैन्यदल प्रमुख मनोज पांडे, नौसेना प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार यांच्या उपस्थितीने नागरिकांना प्रेरणा मिळाली.
दुसर्या दिवशी रविवारी प्रदर्शनाच्याठिकाणी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रदर्शनात मांडलेली हेलिकॉप्टर्स, रणगाडे, बॉम्ब लाँचर, विविध क्षेपणास्त्रे, सैन्यदलात वापरल्या जाणार्या रायफल्स, त्याच्यासाठी वापरल्या जाणार्या विविध आकाराची काडतुसे, मिसाइल्स या सर्व शस्त्रांस्त्रांबाबत नागरिकांच्या मनात कमालीची उत्सुकता पहायला मिळाली.
लष्करी जवान व प्रदर्शनात सहभागी झालेल्या खासगी उत्पादक कंपनी प्रतिनिधींकडून नागरिक प्रत्येक बाबीची माहिती जाणून घेत होते. तर हेलिकॉप्टर व रणगाड्यांसोबत छायाचित्र काढण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
सोमवारी (दि.26) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी सकाळी साडे आठ वाजता नेव्ही बँडचे सादरीकरण होणार आहे. साडे नऊ ते पावणे दहा वाजता इंडियन नेव्ही विषयी सादरीकरण करण्यात येणार आहे.सव्वा दहा वाजता एमएसएमई धोरणाविषयी विद्यार्थ्याना सैन्य दल प्रमुख जनरल मनोज पांडे मार्गदर्शन करतील. त्यानंतर जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल जे.बी.चौधरी हे विविध दालनांना भेटी देतील.