नवी दिल्ली – इंडिया सुपर सीरिज 500 बॅडमिंटन स्पर्धा, तसेच जानेवारीत होत असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताची अव्वल ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू सज्ज झाली आहे.
12 जानेवारीपासून सिरीज स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यानंतर सुपर सिरीज स्पर्धा 11 ते 16 मे या कालावधीत रंगणार आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा खेळाडूंसाठी अखेरची संधी असेल, असे सांगतानाच जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) 2021 मोसमासाठीच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
ऑलिम्पिक पात्रतेचा कालावधी पुढील वर्षी स्विस खुल्या (2 ते 7 मार्च) स्पर्धेद्वारे सुरू होत आहे. एकूण 17 स्पर्धामध्ये गुण मिळवून खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित करता येईल. ऑलिम्पिक पात्रतेचा कालावधी इंडिया सुपर सिरीज स्पर्धेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
यावर्षी इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा 8 ते 13 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार होती. पण करोनामुळे ती नंतर रद्द करण्यात आली. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली थॉमस आणि उबेर चषकाची अंतिम फेरी आता डेन्मार्क येथे खेळवण्यात येईल.