दुबई – न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली असून त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर आयसीसीने वर्षाअखेरीस नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.
गेल्या काही सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीचा विल्यमसनला फायदा झाला असून त्याने पहिले स्थान पटकावले. 890 गुणांसह विल्यमसन पहिल्या स्थानावर असून स्मिथ पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
याव्यतिरिक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो क्रमवारीत सहाव्या स्थानी आला आहे, तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावांत अनुक्रमे 195 आणि 200 धावांत गारद केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे.
रविचंद्रन अश्विनच्या क्रमवारीत दोन अंकांनी सुधारणा झाली असून तो सातव्या स्थानी पोहोचला आहे. याचसोबत जसप्रीत बुमराहच्या क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली असून तो नवव्या स्थानी आला आहे.